Top
This website is best seen at 1024px X 768px resolution in Internet explorer 7 or above.

Please update your browser to any latest version. or shift to Chrome, Firefox, Opera.

देवी महात्म्य

देवीच्या उपासकांचा एक प्रमुख ग्रंथ असून या ग्रंथाची रचना मार्कंडेय पुराणांतर्गत झालेली आहे. यामध्ये 567 लोक असून ते एकूण 13 अध्यायात विभागलेले आहे. तसेच त्याचे 700 मंत्रात विभागन केलेले असल्यामुळे हा ग्रंथ सप्तशती किंवा दुर्गा सप्तशती या नावाने प्रचारात आहे.

देवी महात्म्यात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या देवीच्या त्रिविध स्वरुपांची चरित्रे ग्रथीत झालेली आहेत. प्रथमाध्यायात महाकालीचे चरित्र आहे. या अध्यायात 71 ते 87 या 17 मंत्रात ब्रह्मस्तुती आहे. हेच पौराणिक रात्रिसूक्त आहे. 2 ते 4 अध्यायात महालक्ष्मीचे चरित्र आहे.

 यामध्ये प्रामुख्याने महिषासुर वधाची कथा वर्णिलेली आहे. चौथ्या अध्यायात पहिल्या 27 मंत्रात देवांनी केलेली जगदंबेची स्तुती आहे. यात देवीचे विश्वकारक स्वरुप वर्णन केलेले आढळते. शेवटच्या 9 अध्यायात(अध्याय 5 ते 13मध्ये) महासरस्वतीचे चरित्र आहे. या भागात प्रामुख्याने शुंभनिशुंभांच्या वधाचे वर्णन केले आहे. देवीसूक्त नावाने प्रसिध्द असणारा मंत्रसमूह याच भागात आहे. अकराव्या अध्यायातील पहिल्या 35 मंत्रांच्या समूहाला नारायणी स्तुती म्हटले आहे.देवीच्या या त्रिविध स्वरूपाची ही चरित्रे सुमेधा ऋषीने सुरथ राजा आणि समाधी वैश्य यांना सांगितली.

शत्रूकडून पराभूत झालेला सुरथ राजा आणि धनलोभापायी बायकापोरांनी मारपीट करुन घराबाहेर घालविलेला समाधी वैश्य यांची अरण्यात भेट होते. हे दोघेही सुमेधा ऋषीला शरण जातात. सुमेधा ऋषींनी त्यांना आदिशक्ती देवीचे महात्म्य आणि तिच्या उपासनेचा मार्ग दाखवला. त्यानंतर त्या दोघांनी देवीची उपासना केली. सुरथाला पुनश्च राज्यप्राप्ती झाली आणि समाधी वैश्याला मोक्षप्राप्ती झाली.

महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती ही त्रिविध रुपे अनुक्रमे शरीरबल, संपत्तीबल व ज्ञानबल यांची प्रतीके आहेत. यांच्या उपासनेने सर्वांचे जीवन सर्वांगी समृध्द होऊ शकेल, असा सप्तशतीचा संदेश सुमेधा ऋषींनी या ग्रंथात दिलेला आहे. ज्या ज्या वेळी दैत्यांपासून पीडा उत्पन्न होईल त्या त्या वेळी मी अवतार धारण करीन व शत्रूचा संहार करीन, असे आश्वासन देवीने या ग्रंथात दिलेले आहे. या ग्रंथाला संक्षिप्तमध्ये चंडीही म्हणतात. देवीकृपा मिळविण्यासाठी देवीभक्त या सप्तशतीचे पठन करतात.

प्रा. सुभाष पवार

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.