Top
This website is best seen at 1024px X 768px resolution in Internet explorer 7 or above.

Please update your browser to any latest version. or shift to Chrome, Firefox, Opera.

कुणबी समाज अजूनही बेदखल!

आपल्या मुंबापुरी महानगरीत विविध समाजगट गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांच्या काही समस्या आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एक राजकीय कलदेखील आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर `दै. नवशक्ति’ सादर  करत आहे, मुंबईचं अस्सल सामाजिक राजकीय विश्लेषण, `मत’पंचायत’. आज मुंबईतल्या कुणबी समाजाचा आमचे प्रतिनिधी प्रकाश सावंत यांनी घेतलेला वेध.

कुणबी समाजाचे तिलोरी कुणबी, ताल्हेर कुणबी, तलहेरी, धनोजे कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा असे विविध पोटघटक. कोकणात कुळवाडी म्हणून परिचित. जाधव, लोणारे कुणबी देशावरचे. एकेकाळचा कुळपती आता भूमिहीन, शेतमजूर झालाय. परिणामी, समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागासलेपण अजून कायम आहे…

कुळपती, कुळवै, कुळंबी आणि कुणबी. कुळंबीज म्हणजे मूळचे उत्तर ध्रुवाकडून काबूल, कंदहारच्या मार्गाने आलेले आर्य. कुळंबीज म्हणजे सार्या कुळांचे मूळ बीज. अस्सल क्षत्रिय. कुळ सांभाळणारे. जमीन कसणारे. समाजाचे तिलोरी कुणबी, ताल्हेर कुणबी, तलहेरी, धनोजे कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा असे विविध पोटघटक. कोकणात कुळवाडी म्हणून परिचित. जाधव, लोणारे कुणबी देशावरचे. एकेकाळचा कुळपती आता भूमिहीन, शेतमजूर झालाय. परिणामी, समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागासलेपण अजून कायम आहे. खांद्यावर घोंगडी, डोक्याला मुंडासे, कानात भिकबाळी, कमरेत आकडी नि कोयती, असा पुरुषांचा भारी रुबाब. भगिनींमध्ये नाकात नथ, कानात बुगडी, हातात पाटल्या, गळ्यात गळसरी यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच

ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला `मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. गौरी गणपती, शिमगा (होळी), देवदिवाळीत रमणारे. नमन खेळे नि दशावतारी खेळे यावर त्यांची विशेष मर्जी. मासे, मटण, कोंबडीवडे त्यांचे सणासुदीचे खाद्य. एकेकाळी नाचणी, वरी, हारीक, दुय्यम दर्जाची धान्ये आणि कंदमुळे खाऊन जगणारा कोकणचा भूमिपुत्र. `कुणबी समाजोन्नती संघा’चे अध्यक्ष चंद्रकांत बावकर, साहित्यिक रोहिदास दुसार आदींशी `मत पंचायती’च्या माध्यमातून संवाद साधला असता, समाजाच्या विविध गुणवैशिष्टय़ांचा आणि प्रश्नांचा उलगडा होत गेला.

कल शिवसेना, राष्ट्रवादीकडे!

मुंबईत कुणबी बांधवांची लोकसंख्या आहे 10 लाखाच्या आसपास. वरळी, कुर्ला, चेंबूर, माहुल, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड, खार, विलेपार्ले, कांदिवली भागात समाजबांधवांची मोठी वस्ती. विद्यमान नगरसेवक काशीनाथ थारळी (विक्रोळी पार्कसाइट), गणपत वारिसे (गोरेगाव). माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अनंत गिते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नरेंद्र तिडके, महादेव शिवलकर, डॉ. श्रीकांत जिचकार, शांताराम घोलप, माजी राज्यमंत्री

ल. र. हातणकर, शामराव पेजे यांनी राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलाय. समाजाचा राजकीय कल शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकलाय.

व्यक्तीविशेष

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, कवयित्री बहिणाबाई चौधरी. महासंगणक तज्ञ विजय भटकर. माजी क्रिकेटपटू एकनाथ सोलकर अशी उत्तुंग नावे आमच्याच समाजबंधूंपैकी असल्याचे सांगण्यात येतेय. याशिवाय, वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविणार्यांत अनेक आहेत. मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू अरुण सावंत, संस्कृतचे प्राध्यापक रघुनाथ गिते, लांजाचे धनावडे. चित्रपट क्षेत्रात संजय खापरे, नीलम शिर्के यांनी आपली नाममुद्रा उमटवलीय. व्यापारउदीम आणि उद्योग क्षेत्रात देवीचंद निमदे, बाळशेट लोखंडे, बाळकृष्ण खराडे, उदेग आणि मनोज घागरूम यांनी नाव कमावलेय. कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. जी. डी. जोशी, प्रगत शेतकरी श्रीपत धनावडे, अनिल गोरिवले, सदाशिव चव्हाण, मुकेश खांबे आणि कृष्णा मोरे यांनी आधुनिक शेतीच्या क्षेत्रात आदर्श निर्माण केलाय. सामाजिक क्षेत्रात दापोलीचे शिंदे गुरुजी, रत्नागिरीच्या श्रद्धा कळंबते तर शैक्षणिक क्षेत्रात खेडचे तु. वा. कदम यांनी विशेष कामगिरी बजावलीय. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, राजापूरच्या गुणाजी विठ्ठल माळी यांनी `कुणबी समाजोन्नती संघा’चे इवलेसे रोप लावले आणि `तयाचा वेलू गेला गगनावरी’ अशी कृतज्ञतेची भावना समाजबंधू व्यक्त करीत आहेत.

परिस्थितीजन्य पुराव्यांचीही पडताळणी करा!

जातीचे दाखले मिळण्यातही समाजबांधवांना आजही मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागतेय. ज्यांनी आपल्या दाखल्यात लेवा कुणबी लावलेय, त्यांना दाखले मिळताहेत. मात्र, ज्यांनी मराठा कुणबी लावलेय, ते जातपडताळणीत बाद ठरताहेत. त्यांना जातीचा दाखला मिळत नाही. त्यामुळे नातीगोती, चालीरीती, आडनावे, गाव असे परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून कुणबी बंधूंना जातीचे दाखले मिळावेत अशी अपेक्षा समाजबांधव व्यक्त करताहेत.

लोकसंख्येच्या आधारे कुणबी बांधवांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, अशीही मागणी केली जातेय. `कसेल त्याची जमीन’ कायदा झाला. मात्र, हजारो एकर जमीन अजूनही कुणबी बांधवांच्या सातबारावर अजून लागलेली नाही. घर कुणबी बंधूंचे, त्यांच्या घराखालची जमीन खोतांची अशी स्थिती अजूनही पाहायला मिळतेय. कुणबी समाजबांधवांमध्ये जमीन कसणारे सारेच, पण जमिनीचे मालक थोडेच अशी बिकट स्थिती उद्भवलीय.

प्रश्न आणि प्रश्न

कुणबी बंधूंना आदिवासी म्हणून स्वतंत्र दर्जा द्यावा, स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी जाणकार करताहेत. ब्रिटिशांच्या राजवटीत तिलोरी कुणब्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. 1940 ते 1959 या काळात आर्थिकदृष्टय़ा मागासलेले म्हणून आरक्षण दिले. पुढे ते काढून घेण्यात आले. कुणबी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर प्रकाशझोत टाकणारा पेजे समितीचा अहवाल राज्य सरकारला 1982 मध्ये सादर झाला. बहुतांशी कुणबी समाज अजूनही डोंगरदर्या, कच्च्या घरात आदिवासीसदृश्य स्थितीत हालाखीचे दिवस काढताहेत. प्रस्थापितांच्या दबावाखाली अजूनही राब राब राबताहेत. यावर पेजे समितीच्या अहवालात बरेच भाष्य करण्यात आलेय. कुणबी वाडय़ावस्त्यांपर्यंत रस्त्यांची कामे हाती घेण्यासाठी अहवालात आग्रह धरण्यात आलाय. मात्र, तब्बल तीस वर्षे झाली तरी या अहवालावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करण्यात आली असली तरी या महामंडळाला सातत्याने तुटपुंजी अर्थसंकल्पीय तरतूद झाल्याने महामंडळाच्या कार्याला कधी गती अशी मिळालीच नाही. याशिवाय, महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय नाही वा त्यासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्गही दिला गेला नसल्याचे सांगण्यात येतेय. पेजे समितीच्या अमलबजावणीसाठी 1974 ला मोठा मोर्चा काढण्यात आला. 2004 मध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मोर्चे काढण्यात आलेत. 2005 ला विधानसभेवर मोर्चा काढण्यात आलाय. मागण्यांचे मोर्चे आणि फक्त मोर्चेच. मात्र, सरकारदरबारी अजूनही ते बेदखल!

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.